मुंबई : ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेची शेवटची सभा शनिवारी बीडमध्ये पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात केला. परंतु, या सभेचे फोटो ट्विट करत भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी ठाकरे गटाची खिल्ली उडवली आहे. भाजप नेते नितेश राणे आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी हे फोटो ट्विटरवर शेअर केले आहे.
नितेश राणे यांनी ट्विटरवर रिकाम्या खुर्च्यांचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच, शकुनीमामाचा बीड मध्ये FLOP शो. महा प्रबोधन म्हणे, असा टोला संजय राऊतांना त्यांना लगावला आहे. तर, उदय सामंत म्हणाले की, महा प्रबोधन सभा बीड... प्रचंड गर्दी... शुभेच्छा, असा निशाणा त्यांनी ठाकरे गटावर साधला आहे. यावरुन आता ठाकरे गट काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, आत्ता जे ४० मिंधे तिकडे गेले आहेत त्यांनी मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकून दाखवावी. ते जिंकले तर मी राजकारण सोडेन. पुन्हा कधीही बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही, असे आव्हानच संजय राऊतांनी महाप्रवोधन यात्रेत शिंदे गटाला दिले आहे. तर, भाजपात शब्दांची पलटी करणारे बेईमान लोक आहेत. हे लोक कळसुत्री बाहुल्या खेळवण्याचे खेळ करतात. परंतु, या त्यांच्या खेळात आमचे ४० भाऊ अडकले आहेत, असे टीकास्त्र सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीसांवर सोडले आहे.