मुंबई : बिग बॉस फेम आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई राजकारणात लवकरच उतरणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांनी तयारी सुरु केली आहे. तशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली आहे. यामुळे सुप्रिया सुळेंना तृप्ती देसाई टक्कर देणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या की, शिंदे-फडणवीस सरकारचं काम ठिक सुरू आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी १०० टक्के बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढेन. १५ वर्षे बारामतीत घराणेशाहीच सुरु आहे. सुप्रिया सुळे यांनी कधीच कार्यकर्त्यांचा विचार केला नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात जनतेला बदल हवाय, असे त्यांनी म्हंटले आहे.
तर, दुसरीकडे आम आदमी पार्टीकडूनही पक्षात येण्याचं आमंत्रण आल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले. आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आम्ही तुम्हाला बारातमीतून लोकसभेची उमेदवारी देऊ, असे सांगितलं आहे. अनेक पक्षांचे मला फोन येत आहेत. परंतु, मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच पुढचा निर्णय घेणार आहे, असेही तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे.
दरम्यान, तृप्ती देसाई भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा असून त्यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने झाली. शनि शिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावरून स्त्रियांना पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी तृप्ती देसाईंनी आंदोलन केले होते. यानंतर अनेक आंदोलन व वक्तव्यांमुळे तृप्ती देसाई चर्चेत असतात.