राज्यात राजकीय गोंधळ घडत असताना, आता नवे राजकीय समीकरण जुळून येण्याचे चिन्हे दिसत आहे. मागील काही दिवसात भाजपचे वरिष्ठ नेते हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी सातत्याने भेट घेत आहे, या भेटींमुळे भाजप- मनसे युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली होती. त्यावेळी ही राजकीय भेट नसून गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. आज एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात पुन्हा भेट घडून येणार आहे.
भाजप आणि शिंदे गटाचा आमदारांचे आज स्नेहभोजन
आगामी मुंबई महानगरपालिकेचा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कालच भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. त्यावेळी त्यांनी 'मिशन मुंबई'ची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगल्यावर आज भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या स्नेहभोजना दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील उपस्थित असणार आहे. या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात शिंदे गटाचा मनसे सोबतचा युतीबद्दल चर्चेला उधाण आले आहे.
मनसे सोबत युती केल्यास भाजप,शिंदे गटाला मुंबईत फायदा?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी सध्या रणशिंगण फुकले आहे. राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राजकीय समीकरण बदलून गेले आहे. नुकताच मनसेने हिंदुत्वावर पकड मजबूत केल्यामुळे शिवसेनेला मोठ्या धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप आणि शिंदे गटाने मनसे सोबत युती केल्यास आता थेट फटका शिवसेनेला बसू शकतो. त्यामुळे या ठिकाणी भाजप किंवा शिंदे गटाला याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे राजकीय मंडळी या भेटीकडे लक्ष ठेवून आहे.