मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून समोर येत होत्या. परंतु, तारीख ठरली नाही असे वारंवार त्याच्याकडून सांगण्यात येत होते. आता शिंदे गटाकडून गुवाहाटीला जाण्याची तारीख ठरली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे सर्व आमदार हे येत्या 26 व 27 नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार आहेत. सत्ता स्थापनेवेळी ज्या गुहावटीतील रेडिसन हॉटेलमध्ये होते. त्याच हॉटेलमध्ये अपक्ष आणि शिंदे गटाचे आमदारांचे दोन दिवस वास्तव्य असणार आहे. यासाठी रेडिसन हॉटेलमधील 100 पेक्षा अधिक रूम बुक करण्यात आल्या आहेत. 26 नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता शिंदे गच मुंबईतून रवाना होईल. व त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार दुपारी 3 वाजता कामख्या देवीचे दर्शन घेतील. व दुसऱ्या दिवशी 11 वाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत, असा कार्यक्रम शिंदे गटाचा असल्याचे माहिती मिळत आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा अद्याप प्रलंबित आहे. या मंत्रीमंडळ विस्ताराकडे शिंदे गटातील अनेक नाराज आमदारांचे लक्ष आहे. त्यामुळे कोणाची नाराजी दूर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हिवाळी अधिवेशनाआधी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल, असे संकेत काही मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे कदाचित याच विषयावर चर्चा करण्यासाठी शिंदे गट गुवाहाटीला जात असल्याची चर्चा आहे. चर्चा झाल्यावर हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.