मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला असून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहे. त्यांच्यांसोबत 35 आमदारांचा गट असल्याच्या बातम्या येत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेत डॅमेज कंट्रोल करत असून शिंदे यांच्यांशी चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक हे सुरतमध्ये दाखल झाले. अर्धा तास तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी तीन प्रस्ताव ठेवल्याचे सूत्रांकडून समजत आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. त्यांच्या मनधरणीसाठी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे सूरतमध्ये पोहोचले आहेत. तीनही नेत्यांमध्ये किमान अर्धा तास चर्चा झाली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी तीन प्रस्ताव मिलिंद नार्वेकरांकडे मांडले असल्याचे समजते आहे. यामध्ये 1. सरकारमधून बाहेर पडा, 2. भाजपसोबत सरकार स्थापन करा, 3. गटनेता मीच राहणार असे प्रस्ताव शिंदेनी दिले आहेत. एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक हे पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर, मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक यांना एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यात यश आले का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे सध्या संपर्काच्या बाहेर असून राज्यात मोठे वादळ निर्माण झाले आहे. अशातच एकनाथ शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. शिवसेनेनेही त्यांचे गटनेतेपद काढून त्यांचे परतीचे दोर कापले आहेत. अशातच, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, अशा आशयाचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.