एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि शिंदे-भाजप सरकार आले. यादरम्यान शिंदे गटाकडून अनेक वेळा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपविण्याचा आरोप करण्यात आला. बाळासाहेब असते तर शरद पवारांसोबत कधीही सत्तेत सहभागी झाले नसते, असा दावा करण्यात आला. परंतु, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे हाडाचे वैर असले तरी त्यांच्यात राजकारणापलीकडची मैत्री होती.
राजकारणात कधीच कोणी कुणाचा कायम शत्रू नसतो, असे म्हंटले जाते. बाळासाहेब आणि शरद पवार यांचेही नातेही काहीसे असेच होते. दोघेही एकमेकांवर मनसोक्त टीका करायचे. त्यांच्यातील वैर संपूर्ण देशाला माहित आहे.परंतु, वैयक्तिक जीवनात दोघेही मैत्रीचे हे नाते जपत होते. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीचे एक उदाहरण नेहमी दिले जाते ते म्हणजे सुप्रिया सुळे यांची उमेदवारी.
सुप्रिया सुळे यांची राज्यसभेची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर एका पत्रकाराने बाळासाहेब ठाकरेंना तुमचा उमेदवार कोण असेल? असे विचारले. यावर त्यांनी ‘शरदबाबूंची मुलगी उभी असेल तर आमचा उमेदवार नसेल’ असे सांगून बिनविरोध निवडणूक केली होती. यानंतर १९९९ मध्ये युतीचे सरकार येईल असे वाटत होते. तसेच, सेना आणि राष्ट्रवादी आघाडी होईल, असे भाकितही वर्तविले जात होते. परंतु, असे झाले नाही.
तर, शरद पवारही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगतात. असेच एका भाषणात शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एकत्र मासिक काढणार होतो, असे सांगितले. शरद आपल्या भाषणात म्हणाले की, त्यावेळी टाइम या मासिकाची मोठी चर्चा होत असे. बाळासाहेब व्यंगचित्रकार आणि मार्मिक लेखनासाठी ओळखले जात होते. टाइमच्या धर्तीवर राजकीय विषयांना वाहिलेले राजनीती हे मासिक सुरू करायचे त्यांनी ठरविले. अतिशय कष्ट घेऊन त्यांनी या मासिकाचा पहिला अंक काढला. त्यानंतर तो अंक अगदी भक्तिभावाने सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण केला. त्यानंतर या दोघांनाही मासिकाचे भविष्य काय असेल असे एकाला विचारले. त्यावर ‘हा अंक बाजारात दिसणार नाही, असे भविष्य त्यांनी सांगितले. आणि ते भविष्य खरे ठरले. खरंच तो अंक बाजारात दिसला नाही. कारण पुढचा अंकच निघाला नाही, असे मिश्किलपणे शरद पवार सांगतात.