मुंबई : प्रकाश आंबेडकर हे लहान डोक्याचे आहेत, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. या विधानावरुन बावनकुळेंविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आक्रमक झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातूबाबत बावनकुळेंनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा आंबेडकरी जनता राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी काल पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे विधान केलं आहे. बावनकुळेंनी प्रकाश आंबेडकर संविधाननिर्माता, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल तोंड सांभाळून बोलावे अन्यथा आंबेडकरी जनता तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये फिरू देणार नाही.
भाजपाच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारने संविधान बदलण्यासाठी समिती नेमली होती आणि ज्या हिंदुत्वाच्या विचारधारेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला आहे. त्याच विचारधारेला पुढे घेऊन जाण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे भाजपाला आंबेडकर विचाराचे किती प्रेम आहे हे भारताच्या जनतेला सर्वश्रुत आहे.
बावनकुळे तुमचा तर मेंदू गुडघ्यात आहे. कारण ज्या ओबीसी आरक्षणाला आणि मंडल आयोगाला विरोध भाजपाने केला त्याच भाजपात तुम्ही काम करत आहात. त्यामुळे लहान डोक्याचे कोण आहे ते तुम्हीच विचार करा, असा घणाघात सचिन खरात यांनी केला आहे.
काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?
प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत, असं म्हंटले होते. या विधानाचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जे मनुस्मृतीविषयी जे वक्तव्य केलं कारण ते इतक्या लहान डोक्याचे आहेत. भाजपामध्ये सर्वाधिक आदिवासी आणि मागास वर्गांचे कार्यकर्ते आहेत. हे त्यांना कळत नसेल तर काय बोलणार असं बावनकुळे यांनी म्हंटले होते.