पुणे : पुण्याजवळ असलेल्या कोरेगाव-भीमा येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी आले आहे. आज पहाटेपासूनच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केली. 205 वा अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही शौर्यस्तंभाला अभिवादन केले.
रामदास आठवले म्हणाले की, २०५ वा शौर्यादिन आहे. केंद्र राज्य सरकारच्या वतीने आणि समाजाच्या वतीने अभिवादन करायला आलो आहे. भीमा-कोरेगाव येथे लाखोंच्या संख्येने लोक येत असतात. येथे १०० एकर जमिनीवर स्मारक उभे राहील. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटणार असून स्मारकाची मागणी करणार आहे. आणि निधी समाज कल्याण विभाग सरकार देईल, असे त्यांनी सांगितले आहे.
तर, भाजपवर विरोधकांकडून वारंवार टीका करण्यात येत आहे. यावर मी शांत बसणार नाही. मी वेळोवेळी माझी भूमिका मांडलेली आहे. चंद्रकांत पाटील यांनीही माफी मागितली आहे, असेही आठवले यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, कोरेगाव भीमा येथे आज विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो भीमसैनिक उपस्थित राहिले आहेत. विजयस्तंभ परिसरात फटाके फोडून भीम वंदना केली. व भीम घोषणांनी विजय स्तंभ परिसर दुमदुमून गेला होता. आज दिवसभरात या ठिकाणी लाखो भीमसैनिक या विजय स्तंभाला अनुवादन करणार आहेत.