महाराष्ट्रात शिवसेना पक्षामध्ये बंडखोरी झाल्यानंतर सत्तापालट झाला. तेव्हापासूनच राज्यातील राजकीय क्षेत्रात उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेतून बाहेर पडेलेले आमदार, खासदार यांचा गट शिवसेना आपली असल्याचा दावा करत आहे तर, उद्धव ठाकरे हे शिवसेना आपली असल्याचं वारंवार सांगत आहेत. सध्या खरी शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात आहे. अद्याप शिवसेना कुणाची यावर न्यायालयाकडून निर्णय आलेला नाही. सध्या राज्यात शिवसेनेची परंपरा असलेला व शिवसैनिक वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा दसरा मेळावा यंदा कोण घेणार यावर वाद सुरू आहे.
दसरा मेळावा वाद:
शिवसेनेकडून दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसैनिकांचा मेळावा घेतला जातो. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षाचे प्रमुख राज्यभरातील शिवसैनिकांना संबोधित करतात. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत या मेळाव्यामध्ये बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करत. मागच्या दोन वर्षांत कोरोना संकटामुळे हा मेळावा झाला नाही. परंतू, आता कोरोनाचं सावट कमी झालं असलं तरी, शिवसेनेत आता दोन गट पडले असल्याने हा मेळावा नक्की कोण घेणार यासाठी संघर्ष सुरू आहे. मूलत: हा मेळावा दादरमधील शिवाजी पार्क मैदान अर्थात शिवाजीपार्कवर घेण्याची शिवसेनेची परंपरा आहे. मात्र, यंदा शिंदे गट व उद्धव गट हे शिवनसेनेचे दोन्ही गट शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यासाठी आग्रही आहेत. दरम्यान, शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेकडे शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी मागितलेल्या परवानगीवर उत्तर न आल्याने काल शिवसेनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे, शिवाजीपार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार याचं चित्र आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
याचिकेवर आज सुनावणी:
शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्या. धानुका, न्या. कमल काथा यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. या सुनावणीमध्ये काय निर्णय येतोय याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागुन आहे.
शिवसेनेच्या याचिकेत काय आहे?
पूर्वपरवानगी मागूनही अद्याप मुंबई महापालिकेकडून उत्तर नाही
पालिकेवर राज्य सरकारचा दबाव असल्याचा याचिकेत आरोप