मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून लागू करण्याचे जाहीर करुन विद्यार्थ्यांसमोरचा संभ्रम दूर केला आहे. 'एमपीएससी'च्या या निर्णयाचे स्वागत करत असून गेल्या काही दिवसांपासून राज्यभर सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. परंतु, आता यावरुन राजकीय श्रेयवादाची लढाई रंगलेली दिसत आहे.
ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवारसाहेबांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली होती, ती निर्णायक ठरली, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, निर्णायाचे स्वागत करतो. काही लोक दुटपी भूमिका घेत होते. आम्हाला राजकारण करायचं नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, आमदार अभिमन्यू पवार यांनी एमपीएससी आयोगाचे आभार मानत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी परवाच माझ्या फोनवर बोलताना आश्वस्त केलं होतं. तरी, काही विद्यार्थ्यांनी आंदोलन चालू ठेवलं होत. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे. हे श्रेय विद्यार्थ्यांचेच आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी श्रेय घ्यायच्या भानगडीत पडू नये, असे अभिमन्यू पवार यांनी म्हंटले आहे.