'हर हर महादेव' हा चित्रपट मागचे काही दिवस राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधवांनी हा शो पुन्हा सुरू करायला लावला होता. दरम्यान, आव्हाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह 11 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
आव्हाडांचे कार्यकर्ते पोलिस स्टेशनबाहेर:
जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेतल्यानंतर ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. वर्तक नगर पोलिस स्टेशनमध्ये आव्हाड आहेत तर, पोलिस स्टेशनच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते रस्त्यावर:
पालघर मधील विक्रमगड मतदार संघाचे आमदार व पालघर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल चंद्रकांत भुसारा, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, ठाण्यातील नगरसेवक हनमंत जगदाळे, यांच्यासह राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी वर्तक नगर पोलिस चौकीसह ठाण्यात बंदोबस्त वाढवला आहे.