'हर हर महादेव' चित्रपटावरून सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली होती. त्यांनतर जितेंद्र आव्हाड यांना आज जामीन मंजूर झाला. मात्र, त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करणारे ठाण्याचे डीसीपी विनय राठोड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करणारे ठाण्याचे डीसीपी विनय राठोड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आपल्याला अटक करताना पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्या दबावातून डीसीपी राठोड यांनी आपल्याला अटक केली, असे आव्हाड म्हटले हेाते. त्यानंतर राठोड यांची अचानक परिमंडळ पाचमधून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. मात्र, राठोडांची अशी अचानक बदली का करण्यात आली? त्याचे अद्यापही कारण समोर आलेले नाही.
काय म्हणाले होते आव्हाड?
शुक्रवारी दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाही तर तुम्ही पोलीस स्टेशनला या, असे ते म्हणाले. मी त्यावेळी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलिस स्टेशनला येतो आणि नंतर मुंबईला जातो. असे ते आव्हाड पोलिसांना म्हणाले होते.
पुढे ते म्हणाले की, मी पोलिस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलिस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरून आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही, तो गुन्हा मी कबूल करणार नाही. असे आव्हाड यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता.