राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असा दावा करण्यात आला. यावरच आता शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची सुनावणी आजपासून निवडणूक आयोगासमोर सुरू झाली आहे. यावेळी सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युतीवाद करण्यात आला. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा युक्तीवाद केला.
शिवसेना पक्षप्रमुख पदी उद्धव ठाकरे यांची करण्यात आलेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी केला. शिंदे यांची निवड जुलै 2022 ही राष्ट्रीय कार्यकारणीने केली आहे, त्यामुळे ही निवड योग्य असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला.
शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घेण्यात आलेले निर्णय, संघटनात्मक बदल हे बेकायदेशीर आहेत. शिवसेनेची जुनी घटना ही बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. शिवसेनेच्या घटनेत कोणताही बदल न करता पक्षप्रमुख म्हणून पद निर्मिती करण्यात आली असल्याचा दावा शिंदे गटाने केला. पक्षप्रमुख म्हणून राहण्याचा अधिकार ठाकरेंकडे नसल्याचा दावा शिंदे गटाने केला.