राजकारण

...त्यामुळे भाजप व राज ठाकरे यांचे आभार; टीकास्त्र सोडणाऱ्या सामनामधून ठाकरे गटाने मानले आभार

उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांचे आभार मानले होते. परंतु, राज ठाकरे यांचे नाव न घेतल्याने टीका होत होती. आज अखेर शिवसेनेने (ठाकरे गट) सामना संपादकीयमधून आभार व्यक्त केले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अंधेरी निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी केली होती. यानंतर भाजपने एक पाऊल मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली होती. यानंतर शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांचे आभार मानले होते. परंतु, राज ठाकरे यांचे नाव न घेतल्याने उध्दव ठाकरेंवर आता टीका करण्यात येत होती. आज अखेर शिवसेनेने (ठाकरे गट) सामना संपादकीयमधून नावासहीत आभार व्यक्त केले आहे. तसेच, भाजप-शिंदे गटावर निशाणाही साधाला आहे.

भारतीय जनता पक्षाने अंधेरी पोटनिवडणुकीतून मोठय़ा मनाने माघार घेतली. त्यामुळे एक झाले, भाजपासही मन आहे व ते मोठे आहे हे दिसून आले. पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधतात. तीच ‘मन की बात’ अंधेरी पोटनिवडणुकीच्या बाबतीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राखली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्यच आहे. आमदार रमेश लटके स्वर्गवासी झाले तेव्हा शिवसेना एकसंध होती व पोटनिवडणूक लागली तेव्हा शिवसेनेला जमिनीत गाडण्याची भाषा भाजपकडून झाली ही काही आपली परंपरा नाही, पण अघोरी सत्तेपुढे सर्व शहाणपण, परंपरा गुडघे टेकतात, असा टोलाही ठाकरे गटाने भाजप-शिंदे गटाला लगावला आहे.

राजकारणात मढय़ाच्या टाळूवरचे लोणी खाऊ नये ही महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती आहे. अंधेरीच्या बाबतीत निर्णय घेण्यास उशीर झाला व सात उमेदवार रिंगणात असल्याने भाजपने माघार घेऊनही आता पोटनिवडणूक होईल. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन आधीच केले. त्याकडे दुर्लक्ष केले. राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्यास स्व. लटके यांच्या आत्म्यास शांती लाभेल असे पत्ररूपी आवाहन केल्यावर भाजपने त्या पत्राचा विचार केला. त्यामुळे भाजप व राज ठाकरे यांचे आभार मानायला हवेत, अशा भावना ठाकरे गटाने व्यक्त केल्या आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीत ज्या महाराष्ट्रीय परंपरा आणि संस्कृतीची जाण भाजपने ठेवली ती जाण गेल्या दीड वर्षात झालेल्या इतर पोटनिवडणुकांत का ठेवली नाही. कोल्हापूरस पंढरपूर, नांदेडच्या देगलूर या मतदारसंघात आमदारांचे निधन झाल्याने या जागा भाजपने लढवल्या होत्या. एखाद्याच्या निधनाने रिकाम्या झालेल्या जागेवर निवडणूक बिनविरोध व्हावी ही परंपरा या ठिकाणीही राखता आली असती. पण तसे झाले नाही. असो. मुंबईतील पोटनिवडणुकीत या परंपरेचे भान भाजपने राखले. मात्र हे असे का झाले? कसे घडले? भाजपने शिवसेनेसाठी मन मोठे का केले? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला देण्याची गरज नाही. महाराष्ट्र व जनता सर्वकाही जाणते.

शिवसेना अंधेरीतील विधानसभा पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच होती. हा मतदारसंघ स्वाभिमानी शिवसेनेस मानणारा आहे. आताही मतदानाच्या माध्यमातून तेथील लोकांच्या मनातील संताप, चीड व सहानुभूतीचा लाव्हा धगधगत्या मशालीसारखा उसळून बाहेर पडला असता. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणमैदानावरचा हा असा विजय आजच्या सरकारला, मिंधे गटाला व महाराष्ट्राच्या दुश्मनांना परवडला नसता हे मान्य करायलाच हवे. इतके घाव छातीवर आणि पाठीवर झेलूनही शिवसेना जिंकते, पुढे जाते याचा अर्थ उद्याचे भवितव्य हे आमच्या शिवसेनेचेच आहे. ठीक आहे. मैदानात आज नाहीतर उद्या उतरू. आज तरी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळय़ांचे विनम्र आभार! आमच्या मनात कोणतीही जळमटे नाहीत. मराठी एकजूट तुटू नये ही आमची आजही इच्छा आहे, असेही ठाकरे गटाने म्हंटले आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result