राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असा दावा करण्यात आला. यावरच आता शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. मात्र, आता निवडणुक आयोगाने पुन्हा एकदा सुनावणी पुढी ढकलली आहे. त्यावरच बोलताना शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
निवडणूक आयोगाने सुनावणी पुढे ढकलल्यानंतर त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुनावणीची घाई नाही ना निर्णयाची घाई नाही. आमच्या वकिलांनी सांगतिले काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली नाही. काही लोकांना घाई फूट पडली फुटली, मुळात फूट पडली. फूट काय असते हे समजून घ्यायला पाहिजे. शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाणावरच निवडून आले आहेत. त्यांच्या एबी फॉर्मवर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि आमच्या पदाधिकाऱ्यांची सही आहे. ज्यांना आम्ही धनुष्यबाण चिन्ह दिलं, त्यातले काही लोकं फुटून बाहेर पडले, याचा अर्थ पक्षात फूट पडली, असे म्हणता येणार नाही.
काही आमदार-खासदार निघून गेले असतील, मात्र, पक्ष जागेवर आहे. पक्षातील फुटीचा जो देखावा निर्माण केला जातो, तो कथोकल्पित आभासी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत निर्णय लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करू नये. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.