अनिल ठाकरे | चंद्रपूर : राज्याच्या सत्तासंघर्षांवर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. यादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. अशातच, ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही तर रस्त्यावर रक्तपात होईल, असे विधान त्यांनी केले आहे.
काय म्हणाले शरद कोळी?
आमचा आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा मोदी-शाह, शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे. सत्तेवर बसलेली माकडं आहेत आणि ती विकली गेली आहेत असे सांगत न्याय मिळाला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, रक्तपात झाला तरी चालेल, अशी टोकाची भूमिका कोळी यांनी मांडली. आमचा विश्वासघात झाला असून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळाले पाहिजे. सोबतच शिंदेवर योग्य कारवाई झाली पाहिजे, असेही कोळी यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, आजच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांकडून सर्वात प्रथम युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या विरोधात अनादर नोटीस काढावी. राज्यपालांनी राजकीय हेतूने निर्णय घेतले. मविआ सरकार पाडण्यासाठी राज्यपालांच्या हालचाली होत्या. यावेळी वकील सिंघवी यांच्याकडून किहोटो केसच्या दाखल्याचं देखील वाचन करण्यात आले. 27 जूनची परिस्थिती जैसे थे हवी. प्रकरण अध्यक्षांकडे सोपवायचं असेल तर जुन्या अध्यक्षांना परत आणा, असेही त्यांनी म्हंटले आहे.