राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकली. त्यातच साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक सदानंद कदम यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावरून विरोधकांनी एकच टीकेची झोड सुरु केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्यांबद्दल मोठे विधान केले आहे. किरीट सोमय्यांना ईडीकडून पैसे मिळतात असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
सोमय्यांना ईडीच्या पैशांमधून कमिशन मिळते - चंद्रकांत खैरे
हसन मुश्रीफ आणि सदानंद कदम यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, किरीट सोमय्या ईडीचा दलाल आहे. ईडीच्या पैशातून सोमय्या यांना कमिशन मिळते. हे असेच असतात. इन्कम टॅक्सला ज्या खबऱ्याने माहिती दिली, त्या खबऱ्याला त्यांना काहीतरी द्यावे लागत असते. तसेच याचं काम आहे. असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, ईडीच्या कारवाईबाबत किरीट सोमय्यांना कसे कळते? कोणाकडे धाड पडणार आहे? कुणाला अटक होणार आहे? हे कस समजत. किरीट सोमय्यांची स्वतःची यांची अनेक लफडी आहेत. सरकार येते आणि सरकार जाते त्यांचे पुढे काय होते ते पाहा. असा इशारा देखील यावेळी खैरेंनी दिला.