राज्यासह सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच दुसरीकडे सत्ताधारी भाजपविरोधात आता देशभरातील विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, बिहारच्या पाटणामध्ये 15 हून अधिक विरोधी पक्षांची बैठक पार पडली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारातून शुक्रवारी (२३ जून) रोजी ही बैठक पार पडली. याच बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती शेजारी बसलेले पाहायला मिळाले. त्यानंतर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागले. सत्ताधाऱ्यांच्या याच टीकेवर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
भाजपच्या टीके उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलोय अशी टीका करत असाल, तर मग असे फोटो माझ्याकडेही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह तुमचे नेते आहेत की नाही? नवाज शरीफांबरोबर फोटो आहेत. मी माझ्याकडे तुमचा अल्बमच करून ठेवला आहे. यांचे सगळं मुस्लीम प्रेम. मी फक्त मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो म्हणून तुम्ही माझ्यावर टीका करता आहे. मी मुद्दाम बसलो. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, 'तुमचे नेतेही मेहबूबा मुख्तींबरोबर बसले आहेत. मोठी लोके गेली त्या मार्गाने जावे असे म्हणतात. आता तुम्ही यांना मोठे मानता की नाही माहीत नाही. पण जर हे चुकीचे असेल, तर तुमचे नेतेही गुन्हेगार आहेत असे बोला. आधी मोदी, अमित शाह गुन्हेगार आहेत हे बोला. मग उद्धव ठाकरे गुन्हेगार आहेत हे बोला.' असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले.