राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडत असताना वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीची सुद्धा जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्यासाठी साद घातली होती. त्यानंतर या दोन्ही पक्षात युतीच्या चर्चा रंगलेल्या असताना आता या बाबत वंचित बहुजन आघाडीकडून महत्वाची माहिती समोर आली आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेखा ठाकूर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठका सकारात्मक झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला युतीसाठी होकार कळवला असल्याची माहिती त्यांनी दिली.
सुभास देसाई बाळासाहेब आंबेडकरांना दोन वेळा येऊन भेटले. त्यांच्यात दोन बैठका झाल्या. आम्ही शिवसेनेला हे स्पष्ट करण्यास सांगितलं आहे की, वंचित बहुजन आघाडीला मविआचा भाग बनविणार आणि चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढविणार किंवा शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी मिळून निवडणूक लढवणार याबाबत त्यांच्याकडून निर्णय समजल्या नंतर पुढच्या टप्प्याची चर्चा सुरू होईल. असेही त्या यावेळी म्हणाल्या.