पुणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुन्हा अनागोंदी कारभार समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 दिवसांत 22 रुग्ण दगावल्यानं खळबळ उडाली आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी सातत्याने या घटनेची माहिती घेतो आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत आहे. वैद्यकीय शिक्षण या अंतर्गत ते हॉस्पिटल येते तरी सुद्धा मृत्यू हा मृत्यू आहे. ही घटना कशामुळे घडली याचा अहवाल एक-दोन दिवसात येईल, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली आहे.
आयसीयूमध्ये १३ मृत्यू झाले आहेत. तर इतर ४ मृत्यू हे जनरल वार्डमध्ये झाले आहेत. यात डीनचे दुर्लक्ष झालं का हे पाहावं लागेल. पण, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अहवाल येताच नक्की कारवाई होईल. हे प्रकरण कशामुळे झालं आहे याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. चौकशी समिती तयार करण्यात आली असून चौकशी अहवाल मागवला आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे दोघेही लक्ष ठेऊन असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले.
तर, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा वाढीव भार कळवा रुग्णालयावर पडत आहे. परंतु, येथे अपुरी डॉक्टरांची संख्या आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याने रुग्णांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत बोलताना तानाजी सावंत म्हणाले, १६००-१७०० नवीन डॉक्टरांच्या भरतीची माहिती एमपीएससी आयोगाला दिली आहे. अधिवेशनात आम्ही मोफत उपचाराची घोषणा झाली आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, रुग्णालयातील १३ रुग्णांवर अतिदक्षता विभागात तर ३ रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. काही रुग्ण खासगी रुग्णालयामधून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत असताना शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल झाले होते. तर, काही रुग्णांचे वय ८० पेक्षा जास्त असल्याने वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.