पुणे : मराठा आरक्षणप्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नवे वादंग निर्माण झाले आहे. सावंत याच्यांवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. अशात तानाजी सावंत यांनी जाहीर माफी मागितली आहे. तसेच, मराठा समाजाला कुठल्याही प्रकारे दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.
तानाजी सावंत म्हणाले की, मराठा समाजाला कुठल्याही प्रकारे दुखावण्याचा हेतू नसून मी स्वतः एक मराठा आहे. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक अशा प्रकारचे तेढ निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांमुळे आरक्षण मिळाले. भाजप-शिवसेनेची सत्ता असेपर्यंत आरक्षण टिकले. परंतु, सत्तातंर झाल्यानंतर मविआच्या काळात सहा महिन्यात आरक्षण गेले. त्यानंतर अडीच वर्ष कोणीच नेते हे गप्प होते. मात्र, आता सत्तांतर झाल्यानंतर ते बोलायला लागले. टिकाऊ आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची एकच मागणी आहे. तसेच, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही मी कालच्या भाषणात म्हंटले होते. तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे तानाजी सावंत यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते तानाजी सावंत?
आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, आम्हाला एसटीमधून आरक्षण पाहिजे अशा मागण्या होत आहेत. अहो हे कोण आहेत? याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे तुम्हा-आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे सर्वांना माहिती आहे फक्त कुणी बोलत नाही. तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात केले होते.
दरम्यान, यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तानाजी सावंत यांची पाठराखण केली होती. तानाजी सावंत यांनी एखादे वाक्य म्हटलं की त्याची तोडमोड करून ते समोर आणलं जातं. त्यातील ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करताना गोंधळ होतो. आमच्या रावसाहेब दानवे यांच्या बाबतीतही नेहमी हेच होतं. त्यांचं पुढचं वाक्य हे होतं की, आता आपलं सरकार आलंय आपण करूया, अशी सारवासारव चंद्रकांत पाटील यांनी केली होती.