राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे आज राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप आणि शिवसेनाचा वतिने सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची वज्रमुठ सभा होणार आहे. मात्र, याच सभे आधी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेवर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंधारे?
सावरकर गौरव यात्रेवर बोलताना अंधारे म्हणाले की, ती सावरकर गौरव यात्रा नाहीये ती अदानी बचाव यात्रा आहे. ज्यांना अदानींवर कोणी प्रश्न विचारेल अशी भिती वाटते, त्यांनी जाणीवपूर्वक सावरकर गौरव यात्रा काढली आहे. भाजपचा मनात खरचं सावकराविषयी प्रेम असेल तर नाशिकच्या भगूर गावात काय अवस्था झाली आहे. तिथे काय परिस्थिती आहे. तिथे त्यांचं स्मारक का उभं राहिलं नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. भाजपचे जर खरंच सावरकरांवर प्रेम असेल तर भाजपने सर्वात आधी अहमदाबादचं नामांतर सावरकरनगर करुन दाखवावं, मग आम्ही त्यांना मानू... असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
पुढे त्या म्हणाल्या की, किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली होती. हा किमान समान कार्यक्रम सैंविधानिक लोकशाहीची गुज राखणे, आणि ही चौकट जपली गेली पाहिजे अन्यथा भाजप आणि त्यांच्या स्वायत्त यंत्रणांचा वाढता गैरवापर या सर्वांतून लोकशाही उद्धवस्त होण्याची भिती आहे. जर आता विचार केला नाही, आता एकत्र आलो नाही तर 2024 ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल की काय, अशी आम्हाला शंका वाटतेय. अशी टीका त्यांनी यावेळी केली.