मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर आज ऐतिहासिक निकाल आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत निकाल दिला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट करत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. यामुळे एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत नार्वेकरांवर हल्लाबोल केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, आजचा निर्णय हा भाजपाच्या अखत्यारित राहुन घेण्याचे नार्वेकर यांनी काम केलं आहे. यापुढेही देशातील राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेऊन आपली पावले ठेवावी. निकालाचा एकंदरीत विचार केला असता ज्यांनी पक्षाला जन्माला घातलं वाढवलं ते बाळासाहेबांचे विचार आणि घटना बाजूला सरण्याचं काम विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केला आहे.
अध्यक्षांनी काढलेल्या निष्कर्षाचा हेवा वाटावा असा आहे कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कोणाला बडतर्फ करण्याचा अधिकारच नाही हा निर्णय देणे हास्यास्पद आहे. अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावरून असा दिसून येतो की शिवसेनेचा जन्म हा 2022 साली झाला की काय असा सवाल निर्माण होणे साहजिक आहे. शिवसेनेच्या सर्व नियमांना पायदळी तुडवल्याने नार्वेकरांना बेंचमार्क मिळाला आहे, असा निशाणा अंधारेंनी साधला आहे.
गद्दार आणि खोके यांना न्याय देणारं सरकार आहे. जसे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे तसे लोकांच्या विचारात बदल होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली तरी आश्चर्य वाटू नये. खोके है बीजेपी है तो सबकुछ ओके है. नार्वेकरांनी भाजपच्या खाल्लेल्या मिठाला इमान राखण्याचं काम प्रामाणिकपणे पार पडलेला आहे, अशी जोरदार टीका अंधारेंनी केली आहे.