मुंबई : ड्रग्ज प्रकरणात केलेल्या आरोपांवरून देवयानी फरांदे आक्रमक झाल्या आहेत. सुषमा अंधारेंचा गल्लीबोळतील नेत्या असा उल्लेख करत फरांदेंनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार देवयानी फरांदे यांची स्क्रिप्ट नक्की कोण लिहून देतो हे कळत नाही. ज्यांना माझ्याशी थेट भिडता येत नाही ते असे एकेकाला मॅन्युप्युलेट करून पुढे पाठवतात, असा निशाणा अंधारेंनी सत्ताधाऱ्यांवर साधला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, फरांदेची दरदिवशी भाषा बदलते. उदाहरणार्थ पहिल्या दिवशी माझ्या संबंधाने सभागृहाच्या पटलावर बोलताना त्या शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे_ असा उल्लेख करतात. दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्या शिवसेनेच्या नेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे असा उल्लेख करतात. तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या पटलावर पुन्हा बोलताना त्या गल्लीबोळात लढणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे असा उल्लेख करतात. मला घोळ कळत नाही की यातलं नेमकं काय खरं? याचा अर्थ देवयानी फरांदेंना आधी आपण विरोधकाला नेता म्हणून चूक केली आणि आता ती सावरण्यासाठी त्यांना गल्लीबोळातला ठरवावं असं वाटत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पण, जर मग मी गल्लीबोळातला माणूस असेल तर पुन्हा दोन प्रश्न निर्माण होतात. मी गल्ली बोळात काम करते आणि माझं प्रभावक्षेत्र फार वाढलेलं नसेल तर मग सभागृहाच्या पटलावर सलग तीन दिवस तुम्हाला माझ्या नावावर चर्चा का करावीशी वाटते? तुमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मागच्या वर्षीच्या त्याच हिवाळी अधिवेशनामध्ये माझा राजीनामा का मागावासा वाटतो, असे खोचक सवाल त्यांनी विचारले आहे.
तसेच, माझा उल्लेख गल्लीबोळातल्या लढणाऱ्या असा करणार असाल तर तुम्हाला गल्लीबोळातली माणसं कमी प्रतीची वाटतात का? पण याच गल्लीबोळातल्या लोकांच्या मतांवर तुमच्यासारखी माणसं आमदार केली जातात. हे गल्लीबोळातल्या लोकांचे चुकते का? तर मग पुढच्या वेळेला चूक दुरुस्त करावी लागेल, असेही सुषमा अंधारेंनी म्हंटले आहे.