पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर, नवनीत राणा यांच्याविरोधात अमरावती मतदारसंघातून सुषमा अंधारे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. यामुळे नवनीत राणा आणि सुषमा अंधारे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा फडणवीस यांना डोईजड झाल्या आहेत, असा दावा अंधारेंनी केला आहे.
अमरावती लढण्याची चर्चा कोणी केली माहिती नाही. पण, मी गरीब माणूस आहे किंवा नवनीत राणांचा गेम करण्याची तयारी फडणवीस यांनी ठरवलं असेल तर फडणवीस साहेब मला मदत करतील. नाही तर त्याच्या बद्दल नकारात्मक दिसतेय. नवनीत राणा फडणवीस यांना डोईजड झाल्या आहेत म्हणून त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट मुद्दा पुन्हा-पुन्हा काढला जातोय. आम्ही त्यांना अस्मान दाखवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अत्यंत ताकदीने अमरावती मध्ये उतरेन, असा निर्धार सुषमा अंधारे यांनी केला आहे.
तर, विदर्भातील भाजपच्या संघटनात्मक बांधणीतील एका महत्वाच्या पदाधिकाऱ्याने शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्री असलेल्या व्यक्तीचे अत्यंत महत्वाची कागदपत्रे दिले आहेत. व्हॉटसअप चॅटसहित पुरावे आहेत. मराठवाड्यातील एका कॅबिनेट दर्जाचा मंत्र्यांनी धाडस करावं. मग योग्य वेळ आली की पुरावे दाखवू. एकदा नाही तर चारा वेळा माझ्याकडे पुरावे दिले आहेत. भाजप आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदे गटाला संपवू पाहत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपला शिंदे गटाचे ओझं कमी करायचं आहे, वाचाळवीर भरपूर झालेत. शिंदे गटाबाबत नकारात्मक वाढत चालली आहे,असाही दावा त्यांनी केला आहे. झारीतील शुक्राचार्य शिंदे गटाने शोधावा, असेही सुषमा अंधारेंनी म्हंटले आहे.
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थुंकल्याची कृती केली. याचा निषेध करण्यासाठी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत भिंदे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत सुषमा अंधारेंना विचारले असता त्या म्हणाल्या, संजय राऊत आणि मला टार्गेट केलं जातं आहे. एखादा खेळाडू चांगला खेळत असेल तर त्याची विकेट काढली जात आहे. पण ती विकेट जाणार नाही. खेळाडू पट्टीचा आहे. त्यामुळे त्यांना विकेट मिळणार नाही, आम्ही खंबीर आहोत. त्याच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय, मात्र ज्यांना असं वाटत की महाराष्ट्र आपल्यावर थुंकेल त्यांना अस वाटतंय. संजय राऊत यांनी काही चुकीच केलं नाही, अशी प्रतिक्रिया अंधारेंनी दिली आहे.