कोल्हापूर : खारघरमध्ये ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताने तब्बल 15 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापले असून विरोधकांकडून शिंदे-फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर शरसंधान साधले आहे.
आप्पासाहेबांनी साधेपणाने कार्यक्रम करावा अशा सूचना केल्या असतील. मात्र, त्यांनी दिलेली वेळ घेतली म्हणत त्यांच्याबद्दल भाजप चुकीची माहिती देत आहे. 100 हुन अधिक मृत झाले असावेत. मृतांचा आकडा लपवला गेला आहे, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. 16 कोटी खर्च करता तर अजून थोडे पैसे खर्च करून पेंडाल का उभे केले नाही, असा सवालही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे.
आरोग्य विभागाला अगदी शेवटच्या वेळी कार्यक्रमाची कल्पना दिली गेली. स्वतंत्र रुग्णवाहिकेचा मार्ग केला नाही. अनुयायांना मतदार समजून मतावर डोळा ठेवत कार्यक्रम घेतला गेला. शिंदे फडणवीस यांनी खेळ केला, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपचे कोणतेही नेते या लोकांपर्यंत पोहचले नाहीत. अमित शहा यांनीही मतांचे राजकारण केले. अमित शहा मृत लोकांपर्यंत पोहचले नाहीत एवढे सुद्धा त्यांनी पाळले नाहीत. मुख्यमंत्री या घटनेला जबाबदार आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीचा राजकीय इव्हेंट केल्याशिवाय जमत नाही. पाच लाख देऊन हात झटकून चालणार नाही.
सर्वसामान्य लोकांचे सरकार म्हणता आणि पाच लाख देऊन हात झटकता. हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक असाल तर या पापाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. उष्माघात नव्हे तर सुविधेअभावानेही लोक मृत झाले आहेत, असा दावाही त्यांनी केला.