बीड : भाजपात शब्दांची पलटी करणारे बेईमान लोक आहेत. हे लोक कळसुत्री बाहुल्या खेळवण्याचे खेळ करतात. परंतु, या त्यांच्या खेळात आमचे ४० भाऊ अडकले आहेत. याचे वाईट वाटते, असे टीकास्त्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीसांवर सोडले आहे. महाप्रबोधन यात्रेची शेवटची सभा बीडमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
बीड जिल्हा म्हटला की ऊसतोड मजुरांचा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. त्यापाठोपाठ भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आठवतात. मुंडे साहेब होते तेव्हा शिवसेना-भाजपाची युती होती. परंतु आता मुंडे साहेब नाहीत. त्यामुळे युती राहिली नाही. त्याचबरोबर नैतिकता पाळणारी भाजपा देखील राहिली नाही. भाजपात आता शब्दांची पलटी करणारे बेईमान लोक आहेत. हे लोक कळसुत्री बाहुल्या खेळवण्याचे खेळ करतात. आणि या त्यांच्या खेळात आमचे ४० भाऊ अडकले आहेत, असा निशाणा सुषमा अंधारेंनी साधला आहे.
या भाजपने केवळ लोकांचा वापर करून घेतला आहे. वापर करून झाल्यावर त्या लोकांना भाजपाने वाऱ्यावर सोडलं. भाजपाने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा वापर करून घेतला. परंतु, मेटे यांच्यानंतर शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. ही भाजपाची नीती आहे. त्यांनी महादेव जानकरांचा वापर करून घेतला. त्यानंतर त्यांनाही साईडलाईन केले. मग नंबर येतो सदाभाऊ खोत यांचा. भाजपाने त्यांनाही वापरून सोडून दिले. भाजपा अनेकांना वापरते आणि सोडून देते. यावेळी त्यांच्यासोबत आमची ४० भावंडं आहेत. त्यांच्याबरोबरही तेच होणार आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.