मुंबई : छत्रपती संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. अशातच, शिंदे गट व भाजपकडून ठाकरे गटावर टीका करण्यात येत आहे. या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांनी मेहबुबा मुफ्ती सोबत कशासाठी सरकार थाटलं होतं. आमच्याबाबत त्यांनी काळजी करू नये. कधीकाळी पहाटे शपथ घेणारे दादा आज आमच्यासोबत आहेत म्हणून त्यांना अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे, असा खोचक टोला सुषमा अंधारेंनी भाजपला लगावला आहे.
ही सावरकर गौरव यात्रा नाही, तर ही अदानी बचाव यात्रा आहे. बाळासाहेबांनी सावरकर यांच्या स्मारकासाठी जागा देऊ केली होती. त्यावेळी स्मारकाची एक इमारत उभी झाली होती, आता काय केलं भाजपने त्या स्मारकाचं? तिथे प्रदर्शन करण्याच्या ऐवजी तिथे गाळे कोणी विकले, असा सवाल त्यांनी केला. तसेच, भाजपने अहमदनगरचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर करून दाखवावं, असे आव्हानदेखील सुषमा अंधारेंनी दिले आहे.
दरम्यान, संजय शिरसाट यांच्यासारख्यांवर बोलून त्यांना मोठं करायचं नाहीये. अनिल बोंडे यांनी त्यांच्या मतदारसंघात बघावं, तो मतदारसंघ समजावून घ्यावा. वाळू तस्करीत बोंडे यांचं नाव येतं ते त्यांनी बघावं, असा समाचारही त्यांनी टीकाकरांचा घेतला आहे. तर, आज वज्रमुठ सभा आहे, सर्वांच्या सभांवर नजर आहे. मराठवाडा पाणीप्रश्न भीषण आहे त्यावर चर्चा करणं अपेक्षित आहे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.