अभिराज उबले | पंढरपूर : ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या संताविषयीच्या व्हिडीओवरुन वादात अडकल्या आहेत. यावरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आणि त्यानंतर अंधारेंनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली. परंतु, वारकऱ्यांमध्ये अद्यापही रोष असून अंधारेंविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी भाजपवर घणाघात केला आहे. माझी क्लिप म्हणजे भाजपचे षडयंत्र असून आंदोलन करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत, असे म्हंटले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, माझी क्लिप म्हणजे भाजपचे षडयंत्र. खरा वारकरी वाद घालण्याचे अमंगल काही करणार नाहीत. आंदोलन करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत. पंधरा वर्षानंतर ती क्लिप व्हायरल केली. कारण, आता काही प्रश्न विचारले जातात. त्याचे उत्तर त्यांना देता येत नाहीत.
राज्यपाल हटाव व इतर गोष्टींना झाकण्यासाठीचे प्रयत्न टीम देवेंद्र यांच्याकडून सुरू आहे त्याचा भाग म्हणून माझ्याकडे क्लीपचा वापर होतो आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत मी चार महिन्याचे बाळ असेल आणि चार महिन्यातच त्यांना सळो की पळो करत असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसैनिकांच्या मनात किती राग असेल, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला आहे.
माझ्या क्लिपबद्दल चर्चा होते. मात्र, सावरकरांनी तेच लिहून ठेवले आहे. श्री श्री रविशंकर यांनी देखील हेच लिहून ठेवले. त्यांना काही याबद्दल प्रश्न विचारले जात नाही. केवळ मी शिवसेनेत असल्यामुळे माझ्या क्लिपा दाखवून प्रश्न विचारले जातात. लाव रे तो व्हिडिओ म्हणते म्हणून विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली.
प्रसाद लाड, सुधांशू, त्रिवेदी, भगत सिंह कोश्यारी किंवा चंद्रकांत पाटील यांना फुले, शाहू, आंबेडकर, सावरकर हे महापुरुष मोडीत काढून त्यांना फक्त गोळवलकर, हेडगेवार हेच महापुरुष ठेवायचे आहेत, असा आरोपही अंधारेंनी यावेळी केला.
सुब्रमण्यम स्वामींचे, मोदी हिंदुत्ववादी नाहीत हे वक्तव्य गांभीर्यपूर्वक आणि विचार करण्यासारखे आहे. कारण स्वामी हे भाजपचे जुने जाणते नेते आहेत. मोदींच्या अगोदरही भाजपा घडवण्यामध्ये ज्यांनी हयात घालवली त्यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव आहे. मोदी यांच्या सत्ता केंद्र विचाराने अडवाणी, स्वामी मागे पडले आहे.
शहाजीबापू हा रांगडा भाऊ आहे. जरा समजून सांगुया. सेना होती म्हणून 800 मतांनी निवडून आला. चुकलय. आमच्या बहिण-भावांच्या नात्यात जरा समजून सांगुया. मोदींना देखील आव्हान देऊन पंतप्रधान पदावर दावा देणारे नाव देवेंद्र फडणवीस असतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे 40 आमदार कधी भाजपमध्ये घेतील हे सुद्धा कळणार नाहीत, असा टोला त्यांनी शिंदे आमदारांना लगावला आहे.