उस्मानाबाद : कोरोना विषाणू, भ्रष्टाचार, नेत्यांमागे लागलेला ईडीचा ससेमिरा ही अडथळ्यांची शर्यत पार करत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आज सरकारचा निम्मा कालावधी पूर्ण केला. अशातच मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मी विराजमान व्हावे की नाही हा निर्णय जनताच घेईल, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी रविवारी तुळजापूर येथे तुळजा भवानीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्रचा मुख्यमंत्री होण्यास आवडेल का, या प्रश्नावर मी त्याबाबत विचार केला नसून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याबाबत मी ठरवले नाही. त्याबाबत लोक निर्णय घेतील, असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तसेच, चांगला पाऊस पडू दे बळीचे राज्य येऊ दे, असे साकडे देवीला घातल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
तर, दुसरीकडे सुप्रिया सुळे देवीचे दर्शन घेत असताना पुजाऱ्यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होऊ दे, पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडण्यासाठी तुळजापूरमध्ये येऊ, असे साकडे सुळे यांच्यादेखत देवी चरणी घातले. दरम्यान, आत देवीला वेगळे साकडे व माध्यमांसमोर वेगळे वक्तव्य या दोन्ही वक्तव्यांची चर्चा आता राज्यामध्ये रंगली आहे.