मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजीनामानाट्याची राज्यात चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाचं अध्यक्षपदी नेमायचं आणि राष्ट्रवादीने भाजपाबरोबर जायचं, हा 15 दिवस आधीच विषय झाला असल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला होता. यावर आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष करणार होते. तसा प्रस्तावही होता. परंतु, हे मला स्वतःला अस्वस्थ करणारे होते. कारण त्यातील काही गोष्टी मनाला न पटणाऱ्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा नव्हती. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, असे शरद पवार म्हणाले होते आणि स्वतः काल भुजबळ यांनीदेखील त्याची कबुली दिली आहे.
आमची वैचारिक बैठक यशवंतराव चव्हाण यांची, शरद पवार यांची आहे. आणि मी अध्यक्ष झाले असते तर सर्वात आधी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असता हे माझ्यासाठी शक्य नव्हते. कारण मी माझ्या विचारधारेशी तडजोड करू शकत नव्हते, असे त्यांनी म्हंटले आहे.
शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता. भाजपसोबत जाण्याच्या दबावामुळं शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर, दोन्ही वेळेचे शपथविधी शरद पवारांना माहित नव्हते. भुजबळांनीच त्याबाबत कबुली दिली. शरद पवार कायमच स्वत:च्या विचारांवर ठाम असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.