मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. यावर राजकीय वर्तुळातूनही उलट-सुलट प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. परंतु, अजित पवारांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहे. व राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तर, सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली असून माझ्या बिचाऱ्या दादाचं असं झालं आहे की काही झालं तरी खापर त्याच्यावर फुटतं, असे त्यांनी म्हंटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे सर्व अगदीच काल्पनिक आहे. बायको नाराज झाली तर ती घर सोडून जाते का ती रुसून बसते. माझ्या बिचाऱ्या दादाचं असं झालं आहे की काही झालं तरी खापर त्याच्यावर फुटत. या गोष्टी होत असतात. थोडा खट्टा थोडा मीठा या गोष्टी पण चालल्या पाहिजेत. अनिश्चितता ही टीव्हीवर जास्त दिसते आमच्यात तसं काही नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम लावला आहे. कारण नसाताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांबद्द्ल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक सुरु आहे. बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादीचेच आहोत. राष्ट्रवादीतच राहणार आहोत. हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असे अजित पवारांनी म्हणाले आहेत.