बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल लोकशाहीच्या पत्रकाराशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना शिवी दिली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. संपुर्ण राज्यात सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा विरोध म्हणून निदर्शनं करण्यात आली. अनेक ठिकाणा सत्तारांचे पुतळे जाळले तर, अनेकांनी सत्तारांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मात्र, या सर्व प्रकाराबाबत काल सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. आज मात्र सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत एक आवाहन केलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
"माझ्या संदर्भात सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीने जे गलिच्छ विधान केले त्याची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटली यात काही आश्चर्य नाही. याप्रकारच्या भूमिकेचे समर्थन होत नसलं तरी याची जाण सगळ्यांनाच असते असे नाही." असं लिहीत त्यांनी सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. तर, "मला असे वाटते की कुणी चुकीच्या मार्गाने जात असेल व त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत असेल तर त्याची नोंद करून आपण याकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही. जे काही घडलं ते घृणास्पद होतं.मात्र त्यावर उमटलेली प्रतिक्रिया ही महाराष्ट्राचा सुसंस्कृत चेहरा स्पष्ट करणारी होती." असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत व पुरोगामी बाजूचं कौतुक केलं.
नेमकं काय केलं आवाहन?
"माझे सर्वांना असे विनम्र आवाहन आहे की आपण सर्वजण आता याविषयी जास्त प्रतिक्रिया देऊ नये. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!" असं ट्वीट करत त्यांनी सर्वांना शांत राहून या विषयावर अधिक न बोलण्याचं आवाहन केलं आहे.