नवी दिल्ली : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या गदारोळात सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि स्मृती इराणी यांच्यात आज संसदेत मोठा वाद झाला. यावेळी तुम्ही माझ्याशी बोलू नका... असं सोनिया गांधी आपल्याला म्हटल्याचा आरोप स्मृती इराणींनी (Smriti Irani) केला आहे. या संपूर्ण घटनेत सोनिया गांधींना सोबत घेऊन संसदेबाहेर आलेल्या सुप्रिया सुळे यांनी यावेळी झालेला घटनाक्रम सांगितलं.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, स्मृती इराणी म्हणतात की सोनिया गांधींनी त्यांना धमकावलं...मात्र मी प्रामाणिकपणे सांगेल की, मी तिथे उशिरा पोहोचले होते. मी तिथे पोहोचलो तेव्हा सोनिया गांधी कोणाशीही बोलत नव्हत्या. अनेक खासदार तिथे पोहोचले होते. खूप गदारोळ झाला होता. सोनियाजींनी मला सांगितलं की त्या रमा देवी यांच्याशी बोलायला गेल्या होत्या आणि त्या बोलल्यानंतर खूप गोंधळ झाला. त्यामुळे तिथे काय झालं हे कोणी सांगू शकत नाही. सुप्रिया सुळे म्हणाल्या सोनिया गांधी नंतर नम्रपणे माझ्यासोबत बाहेर आल्या. मी त्यांना गाडीपर्यंत सोडलं. संसद हे अत्यंत पवित्र स्थान आहे, त्यामुळे मला वाटते की आपल्यापैकी कोणीही कोणाची दिशाभूल करू नये. आपण सगळे इथे काम करण्यासाठी येतो. लोकशाहीच्या या मंदिराची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपल्यातील प्रत्येक सदस्याने प्रयत्न केले पाहिजेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजता सभागृह तहकूब झाल्यानंतर भाजप खासदार ‘सोनिया गांधी राजीनामा द्या’च्या घोषणा देत होते. त्यावेळी सोनिया गांधी सदनातून बाहेर जात होत्या. मात्र घोषणाबाजीतच सोनिया भाजप खासदार रमादेवी यांच्याकडे परतल्या आणि अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, सोनिया गांधी बोलत असताना रवनीत सिंह बिट्टू आणि गौरव गोगोई त्यांच्यासोबत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींनी रमा देवी यांना विचारलं, "माझं नाव का घेतलं जातंय..." तेव्हा स्मृती इराणी तिथे आल्या आणि म्हणाल्या, "मॅम, मी तुम्हाला मदत करू शकते... मीच तुमचं नाव घेतलं होतं..." तेव्हा सोनिया गांधी त्यांना म्हणाल्या, 'तुम्ही माझ्याशी बोलू नका...'