इंदापूर : मतदार संघातील कामाचा अर्धा वेळ हा केस लढण्यात जात असून नवऱ्याला आणि मुलाबाळांना सांगितले की आता 11 महिने टाटा बाय-बाय. मला फक्त टीव्हीवरच बघा. एकटा माणूस काय करणार सर्व जबाबदारी असतात. त्यामुळे आता ऑक्टोबरपर्यंत वेळ नाही. मतदार संघ बघायचा कामे बघायची की कोर्टाच्या केसेस पाहिजे. पवार साहेब स्वतः जातात. मात्र जनाची नाही मनाची तरी आहे आणि 80 वर्षाच्या वडिलांना एकट जाऊ देईल का कोर्टात असे म्हणत आता न्यायालयीन लढा लढताना मजा यायला लागली. हरेंगे या जितेंगे ये बाद मे देखेंगे मगर लढेंगे जरूर, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील बोरी गावात गावकऱ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, कोर्टाची पायरी चढलोय आता उतरायचे नाही. जेव्हा आपण खरे असतो तेव्हा लढायची, निकालाची भीती वाटत नाही. कारण आपण खरे आहोत. निवडणूक आयोग कधी निकाल देते माहिती नाही. ते किती दिवस चालेल. वकिलांबरोबर आता राहायची सवय झालीय. बरेच दिवस वकील नाही भेटले तर कसं तरी वाटतं, अशी मिश्कील टिप्पणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
दोन्ही बाजूचे वकील माझे दोस्त आहेत. त्यामुळे मी चहा एका बरोबर घेते लढते आणि जेवण एका बरोबर करते. त्यामुळे लोक म्हणतात की हे काय चाललंय. पण मी त्यांना प्रेमाने म्हणते आपली दोस्ती एक तरफ आपली लढाई एक तरफ. वकील देखील पवार साहेबांना भेटल्यानंतर स्वारी म्हणतात. तिथले एक वकील हे सदानंदचे मित्र आहेत ते देखील मला येऊन भेटतात. त्यामुळे मतदारांनी मला समजून घ्या तुमच्या मतदारसंघातून मी गायब झाले नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.