इंदापूर : पुण्यातील कसब्याने खोटेपणाला व भारतीय जनता पक्षाला नाकारले आहे. कसब्यातील एक सीट सौ के बराबर आहे. हा विजय खूप मोठा आहे. त्यामुळे देशात काय वातावरण आहे हे समजते, अशी प्रतिक्रिया कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या झालेल्या विजयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. आज इंदापूर दौऱ्यावर असताना त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा विजय कष्ट करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्याचा आहे. धंगेकर ज्या पद्धतीने लढले त्यामुळे त्यांचे कौतुक करते. सत्तेत असणाऱ्यांनी साम,दाम, दंड, भेद सगळं काही वापरून बघितलं. त्यामुळे हे सिद्ध झाले की, मराठी माणूस हा विकला जात नाही. कितीही पैशाचे वाटप या लोकांनी केले असेल. परंतु, महाराष्ट्र आणि पुण्याचा माणूस हे कधीच सहन करणार नाही. खरा कार्यकर्ता आज जिंकलेला आहे. ही संविधानाची जीत आहे. महाविकास आघाडीची जीत आहे.
भारतीय जनता पार्टी व त्यांच्या आघाडीने दडपशाही केली पैसे वाटले. तरी देखील पुण्याच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. कष्टकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता निवडून आला आहे. भारतीय जनता पार्टीने सच्चा कार्यकर्त्यांना दुखावलं त्यामुळे हा निकाल लागला आहे, असे ही यावेळी खा. सुळे म्हणाल्या.
अगोदरचा भारतीय जनता पार्टी पक्ष चांगला होता. ते सुसंस्कृत होते. परंतु, आताचे फक्त पैसे, ईडी, सीबीआय धमकी एवढेच करतात. देशामध्ये गुंडाराज चालू आहे, राज्यांमध्ये तर काही विचारूच नका. हे ईडीचे सरकार आहे, रोज काही ना काही बोलतात. देवेंद्रजी तर इतके खोटे बोलतात की, त्यांच्याकडून क्लासेस घ्यायला पाहिजे, अशी टीकाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.