लोकशाही न्यूज नेटवर्क
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे चांगलेच पडसाद उमटले. राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नव्या कृषी कायद्यांच्या धोरणांना पवार यांचा सुरुवातील पाठिंबा होता, असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला कानपिचक्या दिल्या.
पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांच्या नव्या कृषी कायद्यांबाबतच्या भूमिकेबद्ल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावर भाषण करताना जोरदार उत्तर दिले. शरद पवार हे 10 वर्षं कृषीमंत्री असताना कोणतेही आंदोलन का झाले नाही? मी इथे शरद पवारांच्यावतीने बोलत नाही. ते आपली भूमिका मांडण्यासाठी सक्षम आहेत. मात्र कोणतेही बदल करताना सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्यांनी चर्चेस सुरुवात केली होती, म्हणून त्यांना विरोध झाला नाही, असे ठामपणे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.