मुंबई : पावसाळी अधिवेशानातील आजचा दिवस वादळी ठरला आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. परंतु, देवेंद्र फडणवीस हे गोलमाल उत्तर देत आहेत. देवेंद्र फडणवीस आम्ही तुमच्याकडे बघून आलो आहेत. तेव्हाच्या सरकारमध्ये चांगली काम झाली नाही म्हणून आम्ही इथे आलो, असे सुहास कांदे यांनी म्हंटले आहे.
सुहास कांदे म्हणाले की, किरीट सोमैय्या आणि अंजली दमानिया यांनी एक याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने यात घोटाळा झाला असल्याचे निरीक्षण नोंदवले. यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली. एसीपीने त्यानंतर 11जून 2015 रोजी एफआयआर दाखल केली. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री व इतर अधिकारी यांनी 20 हजार पानांच्या चार्जशीटवर नमूद केलं.
शेवटच्या 40 दिवसांसाठी नवीन अधिकारी नेमण्यात आले. आणि जे काही आरोपी असतील, मंत्र्यांचे लाडके पुतणे असतील त्यांना डिस्चार्ज केलं. तत्कालीन मंत्री नाशिकमध्ये आले, त्यांचं स्वागत असं करण्यात आलं की ते मंत्री पाकिस्तानच्या आतंकवादयांना मारून आलेलं आहे. असं काय झाल या घोटाळ्यात, सरकार 1160 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सामोर आला तेव्हा न्यायविधी विभागाने का दाबले, असा सवाल त्यांनी विचारला.
सुहास कांदे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, जे कंत्राटदार आहेत. त्यांना दोषमुक्त करण्याचा अर्ज मंजूर केला. विशेष सहकारी वकिलांनी दोषमुक्ती केल्याबद्दल याचिका दिली. उच्च न्यायालयात पुन्हा हा विषय सरकारकडे पाठवला गेला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी नोंद घेण्याऐवजी रिमार्क दिला.
यावर सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले. देवेंद्र फडणवीस हे गोलमाल उत्तर देत आहेत. उद्धव ठाकरे यांना ब्लॅकमेल करून या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने परिपत्रक काढलं होतं. मला जे उत्तर मिळालं आहे त्यावर मी समाधानी नाही. भ्रष्टाचार आपल्याला काढायचं असेल तर हा निर्णय रद्द केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस आम्ही तुमच्याकडे बघून आलो आहेत. तेव्हाच्या सरकारमध्ये चांगली काम झाली नाही म्हणून आम्ही इथे आलो, असे त्यांनी म्हंटले आहे. कांदेंच्या या विधानाची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.
दरम्यान, सुहास कांदे आणि भुजबळ वाद राज्यात सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडी सरकार असल्यापासून हा वाद सुरु आहे. त्यावेळी हा वाद तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतही पोहचला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा वाद काही अंशी मिटवलाही होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आज अधिवेशना दरम्यान हा वाद उफाळून आला आहे.