अनिल ठाकरे | चंद्रपूर : राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, विरोधकांच्या स्वप्नांची दशा करणारा, जनतेला आनंद देणारा आणि विरोधकांचा आनंद हिरवणारा असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला असल्याचे फडणवीसांनी सभागृहात सांगितले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, फडणवीस यांनी मांडलेल्या पंचामृत सूत्रानुसार सर्वसामान्यांचा विकास व महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे. अमृत काळाचं हे प्रथम वर्ष आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारताला विश्व कप्तान बनविण्यात महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग नक्की असेल त्या दिशेने नेणारा हा संकल्प आहे. आज मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, तरुण, नोकरदार, उद्योगपती, व्यावसायिक, या सर्वच बाबींचा सर्वंकष विचार करण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास पुढील वर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी राज्यात विविध कार्यक्रमांसाठी 350 कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले.
राज्यातील शेतकऱ्यांकरीता महासन्मान योजना, अंगणवाडी सेविकाना मानधन वाढ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात भरीव वाढ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन, महिलांसाठी लेक लाडकी योजना निश्चितच दिलासा देणाऱ्या आहेत, असेही मुनगंटीवारांनी म्हंटले आहे.