मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु असून कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. अशातच महाविकास आघाडी विजयाचे दावे केले जात आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यसभेवेळी सुद्धा आघाडीने असेच भाष्य केले होते, अशी टीका केली आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यसभेवेळी सुद्धा आघाडीने असेच भाष्य केले होते. काही नेते सरकारच्या कामगिरीवर नाराज होते. राज्यसभेसारखं याही निवडणूकीत आघाडीला धक्का देण्याची इच्छा आहे, अशी त्यांनी सूचना केली होती.
क्रॉस वोटींगविषयी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप आमदार किंवा कार्यकर्ते कधीही पक्षाच्या धोरणाविरोधात वागत नाहीत आणि हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. तर खडसेंशी मैत्रीपूर्वक संबंध असणं गैर नाही. पण, म्हणून त्यांना भाजपचे आमदार मतदान करणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीत जेव्हा संकट येतं तेव्हा आपापलं बघा ही सारवासारव केली जाते, अशी टीकाही सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे. तर, नाराजीचा फायदा घेऊन आम्ही सत्तेत यावं असा विचार आम्ही करत नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.
राज्यसभेप्रमाणे याही निवडणुकीत चमत्कार होणार अशी चर्चा केली जात आहे. परंतु, विधान परिषदेच्या निवडणुकीचा 6 वाजता निकाल येतील. तेव्हा अंदाज बांधू कोणी कोणाला मतदान केलं. विजयासाठी आम्ही लढतोय आमचा चमत्कारावर विश्वास नाही जनतेसाठी आम्ही लढतोय, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.