राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असा दावा करण्यात आला. यावरच आता शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. या आधी 10 तारखेला सुनावणी झाली होती. शिंदे गटाच्या वकिलांनी सुनावणीत आमच्याकडे संख्याबळ आहे असं म्हटलं होतं. आज तोच मुद्दा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी खोडला आहे.
काय म्हणाले कपिल सिब्बल?
खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचे भासवले जाते आहे कपोलकल्पित आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने जे दावे मागच्यावेळी केले होते ते आज सिब्बल यांनी खोडून काढले. तसंच मूळ शिवसेना आम्हीच आहोत आणि शिवसेनेत जी काही फूट पडल्याचं बोलले जातं आहे त्याचा पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही. ही फूट मुळीच ग्राह्य धरू नये. असे युक्तिवादात म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, आमदारांनी स्वतः पक्ष सोडला आहे त्या घटनेचा पक्षावर काहीही परिणाम होणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत आपण कुठलाही निर्णय घेऊ नये. अशी मागणी देखील सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे यावेळी केली आहे. सोबतच शिंदे गटावर गंभीर आरोप लावत एकनाथ शिंदे गटाने जी प्रतिज्ञापत्रं दाखल केली आहेत ती बोगस आहेत असाही दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे.