मुंबई : अंधेरी पोटनिनडणुकीवरुन राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. यानिमित्ताने शिवसेना (ठाकरे गट) व भाजप-शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. परंतु, नेत्यांच्या आवाहनानंतर अखेर सोमवारी भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे गट) सामना संपादकीयमधून भाजप-शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे, असा इशाराही ठाकरे गटाने भाजप-शिंदे गटाला दिला आहे.
शिवसेनेची ही ‘भडकलेली मशाल’बेइमानीचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिंधे सरकारने केलेला दिसतो. दुसरे म्हणजे भाजप उमेदवाराच्या उमेदवारी अर्जात अनेक गफलती समोर आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याचा धोका होता. या धोकादायक वळणावर भाजप आणि मिंधे गटाच्या गाडीस अपघात होणारच होता. त्या धोक्यातून सुटका करून घ्यायची म्हणून अचानक गाडीस ब्रेक मारून भाजपने ‘यू टर्न’ घेतला. तरी या निर्णयाबद्दल आम्ही संबंधितांचे आभार मानीत आहोत, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला.
मशालीची सुरुवात चांगलीच झाली. आधी ऐटीत बेटकुळय़ा फुगवून शड्डू ठोकणाऱ्यांना कुस्तीआधीच मशालीची धग आणि चटके बसले व त्यांनी कुस्ती न खेळताच मैदान सोडले. अब्रू वाचावी म्हणून ‘झाकली मूठ…’ बंदच ठेवण्याचा भाजपायी मंडळींचा माघारीचा निर्णय हा महाराष्ट्रात एका त्वेषाने पेटलेल्या शिवसेनेच्या ज्वालाग्राही मशालीचा पहिला विजय आहे. बूड भाजण्यापेक्षा तोंड भाजलेले बरे म्हणून भाजपने दारुण पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी माघारीचा सोपा मार्ग निवडला. पण ‘सेफ पॅसेज’ शोधूनही जी बेअब्रू व्हायची ती झालीच, असे टीकास्त्र ठाकरे गटाने भठाजप-शिंदे गटावर सोडले आहे.
मिंधे गटास दूध पाजण्याचे हे प्रकार महाराष्ट्र बघत असला तरी मराठी जनता दूधखुळी नाही. योग्य वेळ येताच महाराष्ट्राच्या या सर्व पुतना मावशींना जनता आपटणार आहे. महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे सरकार बेकायदा आहे व दिल्लीच्या बेकायदा आश्रयाने ते चालले आहे. त्यांचा मतलब इतकाच आहे की, शिवसेनेला खतम करा, महाराष्ट्राला कमजोर करा, मुंबईचे लचके तोडा. अर्थात, महाराष्ट्रात सुरू असलेला पैशांचा आणि सत्तेचा लाजिरवाणा खेळ संपविण्यासाठी शिवसेनेची मशाल आता पेटली आहे.
अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील! पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल! मशालीच्या अग्निप्रकाशात भविष्यातील शिवसेनेचे तमाम विजयमार्ग आम्हाला स्पष्ट दिसत आहेत, असेही ठाकरे गटाने म्हंटले आहे.