राजकारण

'मुख्यमंत्री शिंदे व गटाचा वापर शिवसेनेविरोधात 'कॉण्ट्रॅक्ट किलर प्रमाणे होतोयं'

शिवसेनेने (ठाकरे गट) सामना मुखपत्रातून रोखठोकमधून शिंदे गटावर टीकास्त्र डागले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनेचे चिन्हावरुन ठाकरे गट व शिंदे गटात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाला. यानंतर अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह तात्पुरते गोठविले. यामुळे दोन्ही गटाला मोठा धक्का बसला. शिंदे व ठाकरे गटाला आयोगातर्फे निवीन चिन्ह व नाव देण्यात आले आहे. परंतु, शिंदे गट अद्यापही धनुष्यबाण आमचाच होणार असल्याचा दावा करत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे गट) सामना मुखपत्रातून रोखठोकमधून शिंदे गटावर टीकास्त्र डागले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड कष्टातून निर्माण केलेली शिवसेना दिल्लीतील राज्यकर्त्यांनी कपट-कारस्थानाचे घाव घालून कागदोपत्री संपवली. त्याकामी महाराष्ट्रातील एक शिंदे व त्यांच्या चाळीस गारद्यांची मदत घेतली. शिवसेना हे ज्वलंत नाव गोठवले गेले. बाळासाहेब ज्याची रोज पूजा करीत ते धनुष्यबाण चिन्हदेखील गोठविण्यात आले. महाराष्ट्राची कवचकुंडलेच शिंदे व त्यांच्या गारद्यांनी दिल्लीच्या चरणी अर्पण केली. महाराष्ट्रात दोन शिवसेना निर्माण करून दुष्मनांनी त्यांचे काम केले आहे. ‘‘कोण शिंदे? महाराष्ट्र मोडण्याचा व शिवसेना खतम करण्याचा अधिकार या माणसाला कोणी दिला, असा सवालदेखील त्यांनी विचारला.

शिंदे यांना शिवसेना फोडल्याचे इनाम म्हणून राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. नारायण राणे व त्याआधी भुजबळांसारख्या नेत्यांनाही हा ‘लाभ’ झाला नाही, पण शिंदे यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची व नेता म्हणून प्रतिष्ठा कमावण्याची संधी गमावली. आता असे दिसते की, भाजप त्यांचा वापर ‘कॉण्ट्रक्ट किलर’प्रमाणे शिवसेनेचा काटा काढण्यासाठी करून घेतोय. हे लोकांना पसंत नाही. बीकेसीचा दसरा मेळावा व त्यात दीड तासाचे वाचून दाखवलेले भाषण यामुळे शिंदे हे नेते नसून ‘कॉण्ट्रॅक्ट किलर’च्या भूमिकेत आहेत या भूमिकेवर ठसा उमटला. पुन्हा ‘‘माझीच शिवसेना खरी’’ व त्यासाठी भाजपची यंत्रणा हाताशी धरून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवली हा चीड आणणारा, हळहळ निर्माण करणारा विषय. शिंदे यांच्या अधःपतनाची ही सुरुवात आहे.

शिवसेना फोडल्यानंतर शिंदे हे खलनायक ठरले व लोक त्यांचा तिरस्कार (Hate) करीत आहेत. हे कोणाचे अधःपतन? मुख्यमंत्रीपद हे यश नसून लाचारी व गुलामी आहे. महाराष्ट्र ते पाहतोय. पुन्हा शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह मिळताच त्या मशालीस आव्हान देण्यासाठी समता पार्टीचे लोक शिवसेनेच्या विरोधात उभे केले गेले. गेल्या अनेक वर्षांत समता पार्टी व त्यांची मशाल कोठेच नव्हती. हे सर्व आर्थिक उलाढालीचे व खोक्यांचे प्रताप आहेत. व्यभिचारातून मिळालेल्या सत्तेचे मोल नसते व शिवसेना संपविणे याच ईर्षेतून काम करणारे महाराष्ट्रात टिकले नाहीत, असा इशाराही ठाकरे गटाने दिला आहे.

महाराष्ट्राची, मराठी माणसाची गरज म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. जन्मदात्यांशी व्यभिचार करून मिळालेले सुख फार टिकत नाही, असे हिंदू शास्त्र सांगते. अयोध्येतून आलेल्या संतमहंतांनी शिंदे यांना या शास्त्राची जाणीव करून देऊ नये याचे आश्चर्य वाटते! शिवसेनेपासून दूर होऊन स्वतंत्रपणे काम करायला हरकत नव्हती, पण शिंदे यांना भाजपने कॉण्ट्रॅक्ट किलर म्हणून वापरले. अशा कॉण्ट्रक्ट किलर्सचा राजकीय अंतही वाईट होतो. महाराष्ट्राचा इतिहास व हिंदू धर्मशास्त्र हेच दर्शवते! अशा वेळी खोके निरुपयोगी ठरतात याची प्रचिती लवकरच येईल. शिंदे, अद्यापि वेळ गेलेली नाही! स्वतःला आवरता आले तर बघा, असा सल्लाही रोखठोकमधून देण्यात आला आहे.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड