राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. एकीकडे ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला ज्या निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात जे नाव चिन्ह दिले आहे. त्या निवडणुकीचा पेच आता वाढत चालला आहे. अशातच अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके ह्या शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच या चर्चेला आता लटके यांनी पूर्णविराम दिला असून यासर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. "आमची जी निष्ठा आहे ती, उद्धव साहेबांसोबतच आहे." असे विधान त्यांनी यावेळी केले आहे.
आमची जी निष्ठा आहे ती, उद्धव साहेबांसोबतच
शिंदे गटात जाण्याच्या चर्च्यावर भाष्य करताना ऋतुजा लटके म्हणाल्या की, "माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलेले नाही. अंधेरीतील पोटनिवडणूक मी मशाल चिन्हावरच लढणार" तसेच, "आमची जी निष्ठा आहे ती, उद्धव साहेबांसोबतच आहे. माझे पती रमेश लटके यांचीही निष्ठा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांसोबत होती. आता मी महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. राजीनाम्यासंदर्भात पुन्हा एकदा विनंती करणार आहे की, मला आजच्या आज राजीनामा देण्यात यावा.", असे त्यांनी सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.
अनिल परब यांनी केला होता शिंदे गटावर आरोप
शिवसेना नेते माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषेद घेत शिंदे गट अंधेरी-पूर्व मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना मंत्रीपदाचे आमिष देत असल्याचा गंभीर आरोप केला होता. शिंदे गट त्यांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून दबाव टाकत आहे, असा देखील आरोप परब यांनी केला होता.