राज्यात जोरदार राजकीय गदारोळ सुरु असताना, दररोज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवीनवीन विषयावरून खडाजंगी होताना दिसत आहे. अशातच ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबील थकीत आहे, अशा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणकडून हाती घेण्यात आली होती. या मुद्यावरून राज्य सरकारवर विरोधक जोरदार निशाणा साधत आहे. याच विषयावरून आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले राऊत?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, ”महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे बील माफ करावे, शेतकऱ्यांकडून बील वसूल करू नये, अशी मागणी केली होती. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडून वीजबील वसूल करावेच लागेल, अन्यथा पर्याय नाही, अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकरी खूप संतापले आहे. ही भाजपाची ही रंग बदलणारी राजकीय औलाद आहे. त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.