शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून राज्यात एकच राजकीय गदारोळ सुरु झाला आहे. त्यातच या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले आहे. या गटाकडून शिवसेना आपलीच आहे असा दावा करण्यात येतो. मात्र, या निर्णय निवडणूक आयोगाच्या कक्षात आहे. त्यावरच आज सुनावणी पार पडणार आहे. परंतु, या निर्णया आधी या दोन्ही गटात प्रचंड आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. त्यावरच शिंदे गटातील नेत्यांना आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
उद्धव ठाकरेंचं पक्षाध्यक्षपदच बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाकडून वारंवार केला जात आहे. त्याच दाव्यावर बोलताना अंधारे म्हणाले की, काही पेड ट्रोलर्स चुकीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख, पक्ष बेकायदेशीर आहेत, मान्यता आम्हालाच मिळणार आहे’. संजय शिरसाटसारखा माणूस असं सांगत असेल तर मग निवडणूक आयोगाने तुमच्या कानात येऊन हे सांगितले का? निवडणूक आयोग तुमच्या घरचे आहे का? तुम्ही इतक्या ठामपणे सांगता, तर मग तुमची आणि आयोगाची साठगाठ झाली आहे का? नसेल झाली, तर तुमच्यावर खटला दाखल करावा का? असा देखील प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.
पुढे त्या म्हणाल्या की, वस्तुस्थिती ही आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचे आमदार किंवा खासदार किती आहेत, यावर पक्षाची मान्यता ठरत नसते. जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, त्यानुसार हे मी सांगते. एखादा पक्ष प्रादेशिक आहे की राष्ट्रीय किंवा त्या पक्षाला निवडणूक चिन्ह काय द्यायचं हे त्या पक्षाला मिळालेली मतांची टक्केवारी किती आहे, यावर ठरते. ही मतांची टक्केवारी शिवसेनेने सिद्ध केलेली आहे. अंधेरी पूर्वच्याही निवडणुकीला आपण सामोरे गेलो आहोत. शिंदे गटात गेलेल्या आमदारांचीही मतांची टक्केवारी आपलीच आहे. ते निवडणुकीलाच कधी सामोरे गेलेले नाहीत, तर मतांची टक्केवारी कुठे आहे त्यांच्याकडे? हा कायद्याचा पेच आहे. असे देखील सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.