राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यभरातून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. विरोधकांकडून राज्यपाल हटावची मागणी केली जात आहे. अशातच शिवसेनेसह संभाजी राजे यांनी आक्रमक होत शिंदे-फडणवीस सरकाराला राज्यापालांविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समजत होती. त्यावरच आता शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे.
काय म्हणाले ट्विटमध्ये संजय राऊत?
राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी ट्विटमध्ये लिहले की, राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र! असे त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.