राज्यात एकीकडे राजकीय खळबळ सुरु असताना, सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद आणखीच तीव्र झाला आहे. या दरम्यान, आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटावर आज पुन्हा हल्ला चढवला होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील चार आमदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात केला होता. त्यावरच आता ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरेंचे राणेंना प्रत्युत्तर?
ठाकरे गटावर केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरेंनी राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, राणेंची ही सवयच आहे. चार पक्षात गेले त्यांनी काय केलं. हे सांगायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पदाचा फूल फॉर्म सांगावा किंवा १६ वर्ष ते मंत्रिपदावर होते त्यांनी केलेल्या एक तरी कामाची माहिती द्यावी असे जोरदार प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी राणेंना दिले आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे?
पिंपरी चिंचवडमध्ये रोजगार मेळाव्यात बोलत असताना राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे गट आता कुठे राहिलाय? शिवसेना संपली आहे. 56 आमदारावरुन सहा सातवर आले आहेत. उरलेल्या आमदारांपैकीही काही ऑन दी वे आहेत. ते कधीही आमच्याकडे येऊ शकतात. माझ्या संपर्कात चार आमदार आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला होता.