शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी बंडखोरी झाली. त्यामुळे शिवसेनेत दोन पडले. मात्र, हे दोन्ही गट शिवसेना आपलीच असा दावा करत आहेत. परंतु, यावरच निवडणुक आयोगासमोर दोन्ही गटाचा संघर्ष सुरु आहे. मागच्या सुनावणीत आयोगाने दोन्ही गटांना लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. याच युक्तिवादाबाबत शिवसेना ठाकरे गट नेते अनिल देसाई यांनी माहिती दिली.
काय म्हणाले अनिल देसाई?
२१ जूनपासून जो घटनाक्रम घडला, तो सर्व घटनाक्रम आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी युक्तिवादात केला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबरोबरच यापूर्वी निवडणूक आयोगापुढे झालेल्या सुनावणीतील मुद्द्यांचाही समावेश आहे. याचबरोबर शिंदे गटाने ज्या प्रकारे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता, तो दावा नेमका कसा चुकीचा आहे, हे देखील आम्ही या युक्तिवादात सांगितलं. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पुढे ते म्हणाले की, आमदार खासदार सोडून गेल्याने पूर्ण पक्ष त्यांचा होत नाही. पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो. पक्षाची विचारधारा आणि पक्षाचे नेतृत्व या गोष्टी बघून मतदार मतदान करत असतात. त्यामुळे एखाद्या आमदार-खासदाराने ही जनताच माझी आहे म्हणणं, हा दावाच मुळात चुकीचा आहे. या सर्व गोष्टी आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवून निवडणूक आयोगापुढे मांडल्या आहेत, असे ते म्हणाले.