राज्यात मागील काही दिवसांपासून विविध विषयावरून राजकारण पेटल्याचे दिसून येत आहे. त्यातच दुसरीकडे आता रत्नागिरीमधील बारसू प्रकल्पावरून वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आज शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आज बारसू या ठिकाणी भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना उध्दव ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत, अशा शब्दात त्यांनी राज्यसरकारवर टीका केली.
नेमकं काय केली उध्दव ठाकरेंनी टीका?
आज बारसूच्या प्रकल्पासाठी माझं पत्र नाचवत आहात मग वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एअरबस यांसारखे प्रकल्प गुजरातला का गेले? ते पण माझ्या कारकिर्दीतच येत होते ते तिकडे का जाऊ दिले? आज तुम्हाला सांगतो ही रिफायनरी गुजरातला न्या आणि तिथला वेदांता फॉक्सकॉन किंवा इतर प्रकल्प ज्यांच्यावरुन वाद नाहीत ते महाराष्ट्रात आणा. गिफ्ट सिटी गुजरातला का गेली? चांगल्या गोष्टी दिल्ली आणि गुजरातला न्यायचे आणि पर्यावरणाला हानिकारण ठरणारा प्रकल्प महाराष्ट्राला दिला. चांगले प्रकल्प राज्याबाहेर जाताना सरकार शांत बसले होते. आता बारसू परिसरातील रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करीत आहे. स्थानिक नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार केले जात आहे. मातीची चाचणी घेता तशी लोकांचे मतेही जाणून घ्या. सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत, असे ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, हे सरकार उपऱ्यांसाठी दलाली करत आहे. येथे अनेकांच्या जमिनी आहेत. त्यामुळे त्यांना फायदा होण्यासाठी या प्रकल्प रेटला जात आहे. त्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून लाठीचार्ज केला जात आहे. यातून हे सरकार सामान्यांचे नसून दलालांसाठी काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकल्प झाला नाही तर घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना माघारी कराव्या लागतील. त्यामुळे दलालांसह संबंधितांचे नुकसान होईल. मी पंतप्रधानांना पत्र पाठविले. आता त्याच पत्राचे भांडवल केले जात आहे. मात्र हा प्रकल्प करण्यापूर्वी लोकांचे म्हणणे जाणून घ्या. अशी माहिती उध्दव ठाकरेंनी यावेळी.